कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : मुंबई नेमकी कुणाची याचे सामाजिक वर्णन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या छक्कड लावणी मध्ये केले आहे, पण राजकीय दृष्ट्या मुंबई कुणाची याचे नेमके उत्तर अद्याप तरी कुणाला सापडलेले नाही. पण तरीही मुंबईत आमचीच ताकद जास्त आहे हे ठाकरे बंधूनी जाहीरपणे सांगितल्यानंतर आता त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही मुंबई आमची कशी आहे हे सांगितले आहे. नजीकच्या काही दिवसात मुंबई महापालिकेच्या बेस्ट परिवहन उपक्रमाकडील कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतसंस्थेची संचालक मंडळाची निवडणूक(election) आहे. बेस्टची ही निवडणूक लिटमस पेपर टेस्ट ठरणार आहे.

एक महिन्यापूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद मोठी असल्याचे म्हटले होते. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईवर आम्हा ठाकरे बंधूंचे वर्चस्व आहे. आमची ताकद मोठी आहे असे सांगून मुंबई नेमकी कुणाची या प्रश्नाच्या माध्यमातून चर्चेला तोंड फोडले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र 2014, 2019 आणि 2024 या तीन विधानसभा निवडणुकांचा(election) दाखला देत मुंबईत भाजपचीच ताकद मोठी असल्याचे सिद्ध झाले आहे असे सांगताना त्यांनी ठाकरे बंधूंचे नाव न घेता प्रत्येकाला आपला राजकीय पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे हे सुद्धा स्पष्ट केले आहे.
ठाकरे बंधू यांची राजकीय युती होणार किंवा नाही याबद्दल उलट सुलट चर्चा सुरू असतानाच “बेस्ट” सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाचे निवडणूक जाहीर झाली आहे आणि ही निवडणूक ठाकरे बंधू एकत्र येऊन लढवत आहेत. त्यांच्याविरुद्ध भारतीय जनता पक्षाने सहकार पॅनल चे आव्हान उभे केले आहे. ही निवडणूक मुंबईवर वर्चस्व कोणाचे याची लिटमस पेपर टेस्ट असल्याचे बोलले जात आहे. या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचीही सत्वपरीक्षा होणार आहे.
मुंबई महापालिकेच्या तुलनेत बेस्ट पतसंस्था ही अगदीच छोटी आहे. त्यांची तुलना होऊ शकत नाही. पण तरीही या पतसंस्थेचा आर्थिक कारभार मोठा आहे. म्हणूनच ही आर्थिक संस्था आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरे बंधू आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात प्रामुख्याने लढत होणार आहे.
या निवडणुकीतील(election) मतदारांचा कौल हा मुंबईचा कल कोणाकडे आहे हे काही अंशी ठरवणारा आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत तर भाजपचे प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्यावर या निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
एकीकडे मुंबई कोणाची? मुंबईत ताकद कोणाची? याची चर्चा सुरू असतानाच उबाठा गटाचे संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंची राजकीय युती झाली असल्याचे एकतर्फी जाहीर करून टाकले आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण डोंबिवली या चार महापालिकांच्या निवडणुकीत ठाकरे बंधू हे एकत्र येणार आहेत नव्हे आले आहेत असे जाहीर करून अनेकांच्या भुवया उंचावून ठेवलेल्या आहेत.

युती झाली असल्याचे जाहीर करण्याचे अधिकार ठाकरे बंधूंनी संजय राऊत यांच्याकडे दिले आहेत की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे. ठाकरे बंधूंनी आपापल्या कार्यकर्त्यांना आपण सर्वच जागा लढवणार आहोत असे गृहीत धरून कामाला लागा असे आवाहन यापूर्वीच केले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे ठाकरे बंधू एकत्र येऊन पत्रकार परिषद घेऊन घोषणा करतील. संजय राऊत हे ठाकरे बंधूंचे प्रवक्ते नाहीत, पण हल्ली ते महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांचे प्रवक्ते असल्यासारखे बोलू लागले आहेत.
काहीही असले तरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही सेना एकत्र येऊन आगामी निवडणुका लढवतील यात तीळ मात्र संदेह नाही. दोघांनाही प्रामुख्याने मुंबई महापालिकेची तिजोरी अर्थात सत्ता हवी आहे. आणि या निवडणुकीत(election) खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गरज आहे. ठाकरे बंधूंच्या युतीला महाविकास आघाडी कडून सकारात्मक प्रतिसाद मिळेलच असे नाही. विशेषतः राष्ट्रीय काँग्रेसला राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत घ्यायला अडचण आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तर काँग्रेस कोणती भूमिका घेणार हे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते ठरवतील. दस्तूर खुद्द राज ठाकरे यांनी आपणाला महाविकास आघाडी बरोबर जायला आवडेल असे अद्याप तरी जाहीरपणे सांगितलेले नाही.
हेही वाचा :
स्टेट बँक ऑफ इंडियाकडून मेगा भरती, आजच करा अर्ज
हार्दिक पंड्यामुळे इरफान पठाणला मोठा धक्का…
पुण्यात महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या..