मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रबिंदू ठरला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण(hunger strike) सुरू केले असून हजारो मराठा बांधवांनी संपूर्ण शहर दणाणून सोडलं आहे. यानंतर आता ओबीसी समाजानेही मोठा निर्णय घेत आंदोलनाची घोषणा केली आहे. यामुळे आगामी काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र आंदोलनाच्या ज्वाळांनी पेटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मराठा आरक्षणाला विरोध दर्शवत नागपुरात साखळी उपोषण(hunger strike) करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपोषणाला ३० ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी याची माहिती दिली. भाजप नेते आशिष देशमुख आणि आमदार परिणय फुके यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून सर्वपक्षीय ओबीसी आमदारांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
डॉ. तायवाडे यांनी सांगितले की, “मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलावावं आणि ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देणार नाही, असं स्पष्ट लेखी आश्वासन द्यावं. सरकारने आधी दिलेल्या शब्दावर ठाम राहिलं तर आम्हाला शक्तीप्रदर्शनाची गरज नाही.” तसेच सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर साखळी उपोषण पुढे नेऊन आमरण उपोषणाचाही इशारा त्यांनी दिला आहे.

जरांगेंच्या आंदोलनावर मौन :
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत विचारलं असता डॉ. तायवाडे यांनी कोणतंही भाष्य करण्यास नकार दिला. “त्यांचं आंदोलन थांबवायचं की सुरू ठेवायचं, हे त्यांचं प्रकरण आहे, त्यावर आम्ही काही बोलणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास ठाम विरोध असल्याचं त्यांनी पुन्हा अधोरेखित केलं.
एकीकडे मुंबईत मराठा समाजाचे हजारो बांधव आझाद मैदानावर जमले आहेत, तर दुसरीकडे नागपुरात ओबीसी महासंघ साखळी उपोषणाला सुरुवात करणार आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर दोन्ही समाज आपापली भूमिका ठामपणे मांडत असल्याने राज्य सरकारसमोर मोठा पेच उभा राहिला आहे.
हेही वाचा :
सोनाक्षी सिन्हाच्या ‘Jatadhara’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री
ISRO देणार मोफत ट्रेनिंग! शिक्षणही आणि थोडेफार पैसेही; कसे करावे अर्ज?
रस्त्यावरच अंघोळी अन् तिथेच आराम… Maratha Reservation Morcha चे Video Viral