पुणे शहरात सध्या गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात सुरू आहे. यंदा मेट्रो प्रवाशांची संख्या विक्रमी वाढली असून, नागरिकांच्या सोयीसुविधा व सुरक्षिततेसाठी पुणे प्रशासनाने नवे नियम लागू केले आहेत. यात वाहतुकीसाठी विशेष व्यवस्था, पार्किंगची ठिकाणे, मद्यविक्री(liquor) बंदी आणि ध्वनीप्रदूषणासंबंधी दुरुस्तीचे आदेश समाविष्ट आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात पुणेकरांचा मेट्रोला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ३० ऑगस्ट रोजी एकाच दिवसात तब्बल ३ लाख ६८ हजार ५१६ प्रवासी मेट्रोने प्रवास केला, जे सामान्य दिवसांच्या तुलनेत एक लाखाने जास्त आहे. यामुळे मेट्रोचे उत्पन्न १३ लाखांनी वाढले. पुणेकरांची सोय लक्षात घेऊन मेट्रो सेवा रात्री २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहे.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी २७ ठिकाणी पार्किंगची सोय केली आहे. दुचाकींसाठी न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, गोगटे प्रशाला, पेशवे पार्क, पाटील प्लाझा आदी ठिकाणी व्यवस्था केली आहे. तर चारचाकी वाहनांसाठी निलायम टॉकीज, फर्ग्युसन कॉलेज, एसपी कॉलेज, संजीवनी मेडीकल कॉलेज मैदान आदी ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे भाविकांना वाहने सुरक्षितपणे पार्क करता येणार आहेत.
मद्यविक्री बंदी व ध्वनी प्रदूषण नियम :
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी गौरी विसर्जन (२ सप्टेंबर) आणि अनंत चतुर्दशी (६ सप्टेंबर) या दिवशी संपूर्ण मद्यविक्री(liquor) बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. याच दिवशी मिरवणुकीदरम्यान दुकाने आणि आस्थापने बंद ठेवण्याचे निर्देश दिले गेले आहेत. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत हा निर्णय घेतला असून, सार्वजनिक शांतता सुनिश्चित करणे हा त्यामागील उद्देश आहे.
तसेच, ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० अंतर्गत गणेशोत्सवासाठी दिलेल्या शिथिलीकरणाच्या आदेशात बदल करण्यात आला आहे. सुरुवातीला १ सप्टेंबर (सहावा दिवस) या दिवशी ध्वनीवर्धक वापरास परवानगी होती; परंतु आता हा बदल करून ५ सप्टेंबर (दहावा दिवस) पर्यंत शिथिलीकरण वाढविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी पुणे यांनी हा दुरुस्त आदेश जारी केला आहे.
हेही वाचा :
ऐन गणेशोत्सवात Allu Arjun ला बसला धक्का
कोल्हापूर : डीजेवर नाचून झालं आता कोर्टाच्या पायऱ्या झिजवायच्या, महाविद्यालयीन तरूणांवर गुन्हे
जिओने केला धमाका! लॉन्च केला AI वाला चश्मा, एका क्लिकवर फोटो, व्हिडिओ अन् कॉलिंगसुद्धा