मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या शासनाने मान्य करून जीआर काढल्याने मंत्री छगन भुजबळ हे सरकारवर फारच संतापलेले आणि नाराज झालेले दिसतात. जीआर रद्द करा किंवा आम्हीच म्हणतोय तशी त्यात सुधारणा करा अशी धमकावणीची भाषा त्यांनी सुरू केली आहे.आता तर त्यांनी तीन वर्षांपूर्वी अंतरवाली सराटी या गावात जे घडलं त्यामागे कट कारस्थान होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार त्यात सहभागी होते असा गौप्यस्फोट करून अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावरच त्यांनी शरसंधान केले आहे(politics).

सुमारे तीन वर्षांपूर्वी अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण प्रश्नावर आमरण उपोषण आंदोलन सुरू होते. तेव्हा तेथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांवर आधी दगडफेक झाली. ही दगडफेक करण्यासाठी आधी एक दिवस कट रचण्यात आला. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार सहभागी होते. आणि मग आंदोलकांच्या वर पोलिसांनी लाठीमार केला.असे छगन भुजबळ यांनी नागपूर येथील ओबीसी मेळाव्यात बोलताना सांगितल्यावर खळबळ उडणे स्वाभाविक होतै. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पाठीमागे शरद पवार हेच होते असे त्यांना अप्रत्यक्षपणे सुचवायचे आहे.
इसवी सन 2019 मध्ये शरद पवार यांच्या पुढाकाराने महाविकास आघाडी महाराष्ट्रात सत्तेत आली. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचाही समावेश होता. शरद पवार यांच्यामुळे माझे राजकीय पुनर्वसन झाले अशी प्रतिक्रिया तेव्हा त्यांनी दिली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे माझे दैवत आहे असे छगन भुजबळ यांनी यापूर्वी अनेकदा मीडियासमोर बोलताना स्पष्ट केले आहे. त्यानंतर अजित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. छगन भुजबळ ही त्यांच्यासोबत गेले. तेव्हा त्यांना आपले दैवत आठवले नाही. ते सत्तेत गेले. त्यानंतरही शरद पवार यांच्यावर टीकेचे आसूड ओढताना ते म्हणाले होते की राष्ट्रवादी काँग्रेस च्या वाढीमध्ये माझाही वाटा आहे.

बाळासाहेब ठाकरे यांना दैवतमाळणाऱ्या छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख “टी.बाळू” असा अवमानजनक केला होता. दिल्लीतील महाराष्ट्र सदन भ्रष्टाचार प्रकरणात छगन भुजबळ यांना अटक झाल्यानंतर शरद पवार यांनी आम्ही छगन भुजबळ यांच्या सोबत आहोत अशी प्रतिक्रिया जाहीरपणे दिली होती.मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे जेष्ठ नेते शरद पवार आहेत असे मराठा समाजाच्या आंदोलनाच्या दरम्यान उघडपणे बोलले जात होते. शरद पवार यांनी लिहिलेल्या स्क्रिप्ट प्रमाणे मनोज जरांगे पाटील बोलतात असेही म्हटले जात होते(politics).
तेव्हा छगन भुजबळ हे गप्प होते. मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध ते सातत्याने बोलत होते मात्र त्यांच्या आंदोलनामागे राष्ट्रवादी काँग्रेस आहे याचा साक्षात्कार त्यांना झाला नाही. ओबीसींच्या आरक्षणात मराठा समाज वाटेकरी झाल्यानंतर छगन भुजबळ हे आपण ओबीसींचे तारणहार असल्याच्या थाटात बोलू लागले आहेत. आणि आता त्यांनी अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण हा एका व्यापक गटाचा भाग होता असे म्हटले आहे. पोलिसांवर दगडफेक होण्याच्या आधी रात्री एक कट रचण्यात आला आणि या कटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
त्यांचा अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्याकडे रोख आहे.शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर थेट कट कारस्थानाचा आरोप केला गेल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळ यांना सौम्य भाषेत फटकारले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने कट कारस्थान केले याबद्दलचे पुरावे द्या आणि मगच आरोप करा असे त्यांनी आवाहन केले आहे. एकूणच छगन भुजबळ यांनी आपल्या दैवतावरच गंभीर स्वरूपाचा आरोप केला आहे. उपकाराची फेड त्यांनी अशा प्रकारे अपकाराने केलेली दिसते(politics).
हेही वाचा :
रिकाम्या पोटी संत्रीचा ज्यूस पिण्याचे आश्चर्यकारक फायदे वाचा, एकदा…
‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री मोठ्या चित्रपटातून बाहेर….
6 ऐवजी 4 पाणीपुरी दिल्या म्हणून भररस्त्यात जमिनीवर बसत केला निषेध; Video Viral