दिवाळीच्या(Diwali) पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड ने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठं आकर्षण आणलं आहे. कंपनीने ‘दिवाळी बोनान्झा प्लान’ अंतर्गत नवीन ग्राहकांसाठी केवळ 1 रुपयात सिमकार्ड देण्याची आणि पहिल्या 30 दिवसांसाठी इंटरनेट व कॉलिंग सेवा पूर्णपणे मोफत देण्याची घोषणा केली आहे. ही ऑफर 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत लागू असेल.या योजनेअंतर्गत ग्राहकांना दररोज 2GB हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स, आणि 100 एसएमएस विनामूल्य मिळतील. या ऑफरमागील उद्देश केवळ नवीन ग्राहकसंख्या वाढवणे नसून, BSNL च्या स्वदेशी 4G नेटवर्कचा अनुभव देशभरातील नागरिकांना मिळावा हा आहे.

BSNL चे अध्यक्ष ए. रॉबर्ट जे. रवी यांनी सांगितले की, “आमचे 4G नेटवर्क हे पूर्णपणे ‘मेक-इन-इंडिया’ तंत्रज्ञानावर आधारित असून, आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नाला गती देणारे ठरेल. दिवाळी(Diwali) बोनान्झा प्लान अंतर्गत पहिल्या महिन्यात कोणतेही सेवा शुल्क आकारले जाणार नाही, जेणेकरून ग्राहकांना आमच्या नेटवर्कची गुणवत्ता अनुभवता येईल.”ग्राहकांना ही योजना घेण्यासाठी जवळच्या BSNL सेवा केंद्रात भेट द्यावी लागेल आणि वैध केवायसी दस्तऐवज (जसे आधार किंवा ओळखपत्र) सादर करावे लागतील. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ग्राहकाला सिमकार्ड दिले जाईल आणि फोनमध्ये सक्रिय करताच 30 दिवसांचे मोफत फायदे आपोआप सुरू होतील.
BSNL सध्या देशभरात 4G सेवा विस्तारत असून, लवकरच 5G सेवा सुरू करण्याची तयारीही सुरू आहे. या प्रकल्पात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही प्रमुख भागीदार आहे. TCS चे CFO समीर सेक्सरिया यांनी सांगितले की, “भारतामध्ये विकसित केलेले टेलिकॉम तंत्रज्ञान आता जागतिक दर्जाचे बनले आहे आणि अनेक देश त्याबद्दल रस दाखवत आहेत.”या नव्या ऑफरमुळे BSNL ने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की ती केवळ सरकारी संस्था नाही, तर एक तांत्रिकदृष्ट्या सक्षम, ‘डिजिटल इंडिया’ला पुढे नेणारी आधुनिक दूरसंचार कंपनी आहे. १ रुपयात सिम आणि एक महिना मोफत सेवा ही ऑफर दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ग्राहकांसाठी खऱ्या अर्थाने ‘स्वदेशी डिजिटल भेट’ ठरत आहे.
हेही वाचा :
१ महिन्याच्या बाळावर दुर्मिळ बायलॅटरल डायफ्रामॅटिक इव्हेंट्रेशनची प्रक्रिया..
धावत्या स्कूल बसमध्ये दहावीच्या मुलीचा विनयभंग, ड्रायव्हरच लाजिरवाणे कृत्य
कोल्हापूरात गोकुळ दूध संघाविरोधात मोर्चा…