कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:
दीपावली हा असा एक सण आणि उत्सव आहे की शुभेच्छांची देवाण-घेवाण होत असते. प्रत्येक जण एकमेकांशी संवाद साधताना जिभेवर साखर ठेवत असतो. महाराष्ट्रातील राजकारणी(Politicians) हे सर्वसामान्य जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देत असतात पण याच राजकारणातील बहुतांशी मंडळी राजकीय नेत्यांना अर्थात एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा देताना दिसत नाहीत. त्यांच्याकडून आरोप प्रत्यारोपांचे राजकीय फटाके फोडले जात असताना दिसतात. त्यांच्याकडूनविचारांच्या जागराची अपेक्षा असताना अविचारांचा गोंधळ मात्र सुरू आहे. मराठा विरुद्ध ओबीसी, धनगर विरुद्ध आदिवासी, वंजारी विरुद्ध बंजारा, यांच्यातील जातकलह आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू आहे. या सर्व जात घटकांना राजकारण्यांनी अस्वस्थ करून सोडले आहे. तुमचे आरक्षण संपले, तुमचे आरक्षण काढून घेतले अशा प्रकारचे साप जात घटकांच्या पायात सोडले जात आहेत.

दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला जीआर रद्द करण्यात यावा या एकमेव मागणीसाठी बीड येथे ओबीसींचा महाएल्गार झाला. या मेळाव्यात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांना नेमके काय बोलायचे होते हेच श्रोत्यांना कळले नाही. त्यांचे भाषण ओबीसींना गोंधळात टाकणारे होते. नवनाथ वाघमारे यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीकेचे अग्निबाणच सोडले. महायुतीचे सरकार हे केवळ ओबीसी जनतेने दिलेल्या भरघोस समर्थनामुळे आलेलं आहे. ओबीसींना न्याय देणार नसाल तर आगामी निवडणुकीत तुमचे 132 आमदार निवडून येणार नाहीत. भारतीय जनता पक्षाने माझ्या या वक्तव्याची दखल घ्यावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध(Politicians) आरक्षणाच्या माध्यमातून काही जण षडयंत्र रचत आहेत. त्यांनी सावध झाले पाहिजे. देवेंद्र फडणवीस हे कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत. त्यांना अडचणीत आणले जात आहे अशा आशयाचे प्रतिपादन छगन भुजबळ यांनी बीड येथील महा एलगार मेळाव्यात बोलताना केले.
एकीकडे ते भारतीय जनता पक्षाला इशारा देतात. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक करतात. आणि त्यांना सावध राहण्याचा सल्लाही देतात. त्यांच्या या गोंधळात पाडणाऱ्या वक्तव्याबद्दल त्यांचेच एक सहकार्य नवनाथ वाघमारे यांनी जोरकस टीका केली आहे. छगन भुजबळ हे ओबीसींच्या पाठीत खंजर खुपसत आहेत. ओबीसी बद्दल त्यांच्या मनात इतका कळवळा असेल तर ते नागपूरच्या ओबीसींच्या मेळाव्याला का उपस्थित राहिले नाहीत असा त्यांचा सवाल आहे. त्यांचे नेते अजितदादा पवार यांनी त्यांना चार गोष्टी समजावून सांगून सुद्धा भुजबळ यांचे तोंड काही थांबलेले नाही. मंत्रिमंडळातले स्थान टिकवून ठेवायचे, मंत्री म्हणून घेतलेल्या शपथेचा भंग करायचा, मराठा समाजाच्या विरुद्ध बोलायचे, सरकारने घेतलेल्या निर्णयाचा विरोध करायचा, ओबीसी समाजाचे माथे भडकवायचे, घटक पक्षाला धमक्या द्यायच्या असे प्रकार त्यांच्याकडून सुरू आहेत.
प्रहार संघटनेचे माजी मंत्री बच्चू कडू यांची भाषा कायम कडवट असते. बुलढाणा येथे घेतलेल्या शेतकरी मेळाव्यात त्यांनी”रोज 12 /13 शेतकरी आत्महत्या करत असतील तर एकाला कापायला हवे’असे वादग्रस्त विधान केले आहे. त्यांचा रोख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी”घरात तुमची मुलगी ऐकत नसेल तर तिचे पाय तोडून टाका”असा भलताच सल्ला पालकांना दिला आहे. एम आय एम चे महाराष्ट्रातील नेते जलील यांनी तर “तुमच्या बापाच्या बापाला सुद्धा आम्ही सोडलेले नाही”असा अकारण इशारा दिला असून जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा त्यांचा हेतू दिसतो.भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी तर बोलताना ताळतंत्र केव्हाच सोडून दिलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना व्यक्तिगत पातळीवरील टीका करायची नाही अशी समज दिली असली तरी शहाणपणा स्वीकारतील तर ते पडळकर कसले? जयंत पाटील यांच्या बद्दल बोलताना ते आजही आपली जीभ सैल सोडताना दिसू लागले आहेत.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे धुरांडे पेटू देणार नाही अशी धमकी त्यांनी दिली आहे. नितेश राणे, जितेंद्र आव्हाड, संजय राऊत, सुषमा अंधारे, या सर्वांनी ‘काहीही बोलायचे”हा स्वभाव सोडलेला नाही. जरांगे पाटील यांचा उल्लेख दरिंदे पाटील असा भुजबळ यांनी केल्यानंतर “घुरट भुजबळ” असा पलटवार (Politicians)जरांगे पाटील यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधताना मनोज जरांगे पाटील यांनी “रक्ताने माखलेला चष्मा”असा घनाघात केला आहे. एकूणच दिवाळी उत्सवात काहीजणांनी आपली वैचारिक दिवाळखोरी जाहीर केली आहे. तर काही जणांनी टीकेचे फटाके फोडले आहेत.
हेही वाचा :
मुलीच्या जन्मानंतरची पहिल्यांदाच सिद्धार्थ – कियाराने साजरी केली दिवाळी..
लाल-हिरव्या मिरच्यांपासून तयार केली दिवाळीची लायटिंग…पाहाल तर थक्क व्हाल; Video Viral
35 वर्षांची वहिनी 19 वर्षाच्या दीराच्या प्रेमात,मग जंगलात जाऊन तिथे…