कोल्हापूर महापालिकेत महायुतीकडून पुढील पाच वर्षांसाठी सत्तावाटपाचा स्पष्ट (formula) आणि सर्वसमावेशक फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या धोरणानुसार महापौर, उपमहापौर तसेच विविध समित्यांच्या सभापती पदांवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस व जनसुराज्य या घटक पक्षांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या फॉर्म्युल्यामुळे महायुतीतील सर्व नगरसेवकांना न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.महायुतीच्या या फॉर्म्युल्यानुसार पाच वर्षांच्या कालावधीत एकूण सहा महापौर आणि सहा उपमहापौर असतील अशी माहिती आहे. प्रत्येक महापौराला सुमारे दहा महिन्यांचा कार्यकाळ देण्यात येणार असल्याचेही समजते. तसेच महापालिकेतील सहा प्रमुख समित्यांमध्ये सर्व पक्षांना संधी देण्यात येणार असून, १२ सभापती पदांचे वाटप केले जाणार आहे. याशिवाय अत्यंत महत्त्वाच्या स्थायी समितीच्या सभापती पदावरही भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना टप्प्याटप्प्याने संधी दिली जाणार आहे.

या फॉर्म्युल्यानुसार पहिला महापौर भाजपकडून असणार आहे. (formula) भाजपकडून सध्या सहा नावांची चर्चा सुरू असून, त्यापैकी एका नावावर अंतिम शिक्कामोर्तब केले जाणार आहे. या नावाबाबत प्रदेश पातळीवरील नेतृत्वाचे मत जाणून घेतले जाईल किंवा स्थानिक पातळीवर एकमत झाल्यास तिथेच निर्णय घेतला जाईल, अशी खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळत आहे.महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सत्तावाटपाचा हा फॉर्म्युला अंतिम करण्यात आला मात्र या बैठकीला मंत्री हसन मुश्रीफ हजर नसल्याने अंतीम निर्णय घेण्यात आला नाही. या बैठकीस राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रा. जयंत पाटील, राहुल चिकोडे, शारगंधर देशमुख यांची उपस्थिती होती.
बैठकीत सत्तेचा समतोल राखत शहराच्या विकासाला गती देण्यावर भर (formula) देण्याची चर्चा झाल्याचे समजते. महापालिका निवडणुकीत एकूण ८१ नगरसेवक निवडून आले असून, त्यामध्ये काँग्रेसचे ३४, भाजपचे २६, शिवसेनेचे १५, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा १ आणि जनसुराज्य पक्षाचा १ नगरसेवक समाविष्ट आहे. संख्याबळाच्या दृष्टीने महायुतीला स्पष्ट बहुमत असून, त्याचा लाभ घेत स्थिर आणि समन्वयपूर्ण कारभार देण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. महायुतीचा हा फॉर्म्युला यशस्वी ठरल्यास कोल्हापूर महापालिकेत राजकीय स्थैर्य निर्माण होऊन विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच अंतर्गत मतभेद टाळून एकत्रितपणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा संदेशही या निर्णयातून देण्यात आला आहे.
हेही वाचा :
एकाच दगडात अनेक पक्षी गार; शरद पवारांचा ‘पॉवर’गेम
8 व्या वेतन आयोगाने वेग पकडला, केंद्रीय कर्मचाऱ्यांना बजेटमध्ये मिळणार सरप्राइज?
सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी, बारामतीत घडामोडींना वेग