राज्यात पोलिस(Police) दलातील रिक्त पदांची मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 2024-25 साठी एकूण 15 हजार पोलिस शिपायांची भरती प्रक्रिया मंजूर करण्यात आली. यामध्ये 2022 आणि 2023 मध्ये वयोमर्यादा पार केलेल्या उमेदवारांनाही एकदाच विशेष तरतूदीद्वारे अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.

गेल्या तीन ते साडेतीन वर्षांत महायुती सरकारने शासकीय व पोलिस भरतींमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. यापूर्वी फडणवीस यांनी 75 हजार शासकीय पदांच्या भरतीची घोषणा केली होती. दरवर्षी 10 ते 15 हजार पोलिस शिपायांची भरती केली जाते. मात्र, कोरोनाच्या काळात ही प्रक्रिया ठप्प झाली होती. या काळात हजारो पोलिस निवृत्त झाल्याने दलात मोठी पोकळी निर्माण झाली होती. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात राज्य सुरक्षा महामंडळाकडून काही भरती करण्यात आली होती.

नियमित पोलिस(Police) भरतीस आता प्राधान्य देण्यात येणार आहे. 2024 मध्ये रिक्त असलेली व 2025 मध्ये रिक्त होणारी पदे लक्षात घेऊन ही भरती केली जाणार आहे. यात पोलिस शिपाई 10,908, वाहनचालक 234, बॅण्ड मॅन 25, सशस्त्र शिपाई 2,393 आणि कारागृह शिपाई 554 अशी पदे आहेत. पोलिस शिपाई व कारागृह शिपाई ही गट क संवर्गातील पदे आहेत.
भरतीची प्रक्रिया जिल्हास्तरावर पार पडणार असून ‘ओएमआर’ आधारित लेखी परीक्षा घेतली जाईल. अर्ज मागविणे, छाननी, शारीरिक चाचण्या व लेखी परीक्षा घेण्याचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यात आले आहेत. ही पदे कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातात.
रिक्त पदांमुळे पोलिस व कारागृह कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असल्याचे वास्तव वेळोवेळी समोर आले आहे. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयानेही ही पदे वेळेवर भरावीत असे आदेश दिले होते. त्याचबरोबर विधानसभेत व लोकप्रतिनिधींनीही तातडीने भरती करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर शासनाने मोठ्या प्रमाणावर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा :
हा कसला स्वातंत्र्यदिन साजरा? हवाई गोळीबारात कहर, 3 जणांचा मृत्यू
उरले फक्त काही तास बँकांची काम करून घ्या नाही तर…
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी! पाच महिन्यात योजनेसाठी….