कोल्हापूर शहरात पुन्हा एकदा बिबट्याने(Leopard) धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील विवेकानंद कॉलेज परिसर आणि वूडलँड हॉटेल भागात शनिवारी रात्री उशिरा बिबट्याचे दर्शन झाल्याने वनविभाग आणि पोलिस प्रशासनात खळबळ उडाली. उच्चभ्रू वस्तीत घडलेल्या या घटनेमुळे स्थानिकांनी रात्रीभर धाकधूक अनुभवली.मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री मेरी वेदर ग्राउंड परिसरात काही वाहनचालकांना रस्त्याच्या कडेला बिबट्या फिरताना दिसला.

त्यानंतर तो परिसरातील झाडीतून बाहेर येत थेट विवेकानंद कॉलेजजवळील वूडलँड हॉटेलमध्ये घुसला. हॉटेलच्या बागेत काम करणाऱ्या माळीवर त्याने अचानक झडप घालत हल्ला केला. यात माळी किरकोळ जखमी झाला. याचवेळी हॉटेलमधील प्लेट धुत असलेल्या युवक निखील कांबळे याच्यावरही बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण तो सुदैवाने बचावला.

यानंतर बिबट्या (Leopard)बीएसएनएल कार्यालयात आणि नंतर महावितरण कार्यालयात घुसला, जिथे तो एका चेंबरमध्ये लपला. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असता, बिबट्याने वनरक्षक ओंकार काटकर यांच्यावर हल्ला केला. सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही.घटनेनंतर वनविभाग, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने परिसर सील करून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम हाती घेतली आहे.

विवेकानंद कॉलेज परिसर, वूडलँड हॉटेल, बीएसएनएल आणि महावितरण या ठिकाणी गस्त वाढवण्यात आली आहे. नागरिकांना रात्री बाहेर न पडण्याचे आणि गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.बिबट्या शहरात नेमका कोठून आला याबाबत अजून स्पष्टता नाही, मात्र तो पंचगंगा नदीकाठच्या जंगलातून किंवा आसपासच्या डोंगराळ भागातून शिरला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.

कोल्हापूरमध्ये यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. २०१५ साली रुईकर कॉलनीत बिबट्याचे दर्शन झाले होते, तर १९९५ मध्ये कसबा बावडा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका तरुणीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या नव्या घटनेने जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत.सध्या वनविभागाचे पथक बिबट्याला जिवंत पकडण्यासाठी प्रयत्नशील असून परिसरात पिंजरे बसवण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरू नये, पण सावध राहावे, असे आवाहन वनअधिकाऱ्यांनी केले आहे.

हेही वाचा :

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट

दुधी भोपळ्याची साल फेकून न देता सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटकदार सालीची चटणी

सांगलीत मित्राचा निर्घृण खून…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *