बॉलिवूडचे अनुभवी आणि नामांकित दिग्दर्शक(director) विक्रम भट्ट यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या पत्नी श्वेकांबरी भट्ट यांच्यासह एकूण आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा गंभीर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा गुन्हा इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटलचे संस्थापक आणि प्रसिद्ध डॉक्टर डॉ. अजय मुरडिया यांनी राजस्थानातील उदयपूर येथील भूपालपुरा पोलीस ठाण्यात नोंदवला आहे. डॉ. अजय यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत असा धक्कादायक आरोप केला आहे की, विक्रम भट्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या दिवंगत पत्नीच्या स्मरणार्थ बायोपिक बनवण्याचं प्रलोभन दाखवलं. चित्रपट तयार झाल्यानंतर 200 कोटींचा मोठा नफा मिळेल, अशी हमी देत त्यांच्याकडून विविध टप्प्यांमध्ये 30 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम घेतली.

डॉ. अजय यांच्या तक्रारीनुसार, काही महिन्यांपूर्वी ते उदयपूरमधील एका कार्यक्रमात दिनेश कटारिया यांना भेटले. या भेटीत दिनेश यांनी त्यांना सांगितलं की त्यांनी विक्रम भट्ट यांच्यासोबत अनेक प्रोजेक्ट केले आहेत आणि दिग्दर्शकाशी त्यांचे चांगले संबंध आहेत. या भेटीतच त्यांनी डॉक्टरांना त्यांच्या दिवंगत पत्नीच्या जीवनावर आधारित बायोपिक बनवण्याचा सल्ला दिला. हा चित्रपट तयार झाल्यानंतर डॉक्टरांच्या पत्नीच्या कार्याची, योगदानाची आणि व्यक्तिमत्त्वाची लोकांना माहिती मिळेल, असे ते म्हणाले.
तसेच चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या मोठा नफा कमवेल, चित्रपटाची खर्चापेक्षा चार ते पाच पट कमाई होईल, असंही कटारिया यांनी सांगितलं. ही संकल्पना डॉक्टरांना भावली. त्यानंतर डॉक्टरांनी दिनेशसोबत 25 एप्रिल 2024 रोजी मुंबईला भेट दिली आणि तिथे वृंदावन स्टुडिओमध्ये विक्रम भट्ट यांची भेट झाली. विक्रम भट्ट(director) यांनीही कटारिया यांच्या बोलण्याला पुष्टी देत डॉक्टरांना आश्वासन दिलं की, ‘प्रकल्पातील सर्व काम मी सांभाळेन. तुम्हाला कोणतीही चिंता करण्याची गरज नाही.’ डॉक्टरांनी केवळ निधी उपलब्ध करून द्यायचा आणि बाकी व्यवस्थापन कटारिया करणार, अशी व्यवस्था ठरली.
तक्रारीनुसार, या सर्व आश्वासनांवर विश्वास ठेवून डॉक्टरांनी 31 मे 2024 रोजी पहिली 2.5 कोटी रुपयांची रक्कम पाठवली. त्यानंतर प्रकल्प वाढवला गेला आणि त्यांना एक नव्हे तर चार चित्रपट तयार करण्याची योजना सांगण्यात आली. या योजनांच्या नावाखाली डॉक्टरांकडून वेळोवेळी कोट्यवधी रुपये मागितले जात राहिले आणि त्यांनी एकूण 30 कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित केली. परंतु काही महिन्यांनी त्यांना लक्षात आलं की चार पैकी दोन चित्रपट पूर्ण, एक अर्धवट, आणि चौथा ‘महाराणा-रण’ या चित्रपटाचं शूटिंग अद्याप सुरूही झालेलं नाही. या प्रकल्पावर सांगितल्याप्रमाणे 25 कोटी रुपये खर्च झाले, हेही डॉक्टरांना संशयास्पद वाटले.
डॉ. अजय यांनी असा दावा केला आहे की, विक्रम भट्ट यांनी त्यांना एका दुसऱ्या चित्रपटातही गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त केले. भट्ट यांनी त्यांना सांगितलं की ‘तुम्ही बायोपिकमध्ये गुंतवणूक केली असल्याने तुम्हाला आणखी एका प्रोजेक्टमधून देखील मोठा नफा मिळू शकतो. तुम्ही निधी दिला तर सर्व पैसे परत केले जातील.’ तसेच त्यांच्या पत्नी आणि मुलगीही या चित्रपट निर्मितीत सहभागी झाल्याचं भट्ट यांनी स्पष्ट केलं.
डॉ. अजय यांनी तक्रार दाखल केल्यानंतर भूपालपुरा पोलिसांनी विक्रम भट्ट, श्वेकांबरी भट्ट, दिनेश कटारिया यांच्यासह आठ जणांविरुद्ध IPC कलमांतर्गत फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनुसार, हा प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि आर्थिक फसवणूक, बनावट आश्वासने आणि निधी अपहार यांसंबंधी तपास सुरू आहे. संबंधित आरोपींची चौकशी लवकरच होण्याची शक्यता आहे.विक्रम भट्ट हे बॉलिवूडमधील अनुभवी आणि दीर्घ कारकिर्द असलेले दिग्दर्शक. त्यामुळे त्यांच्या नावावर असा गुन्हा दाखल झाल्यानं चित्रपटसृष्टीत चर्चेला उधाण आलं आहे. भट्ट यांच्याकडून किंवा त्यांच्या टीमकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

हेही वाचा :
पैसे काढण्यापूर्वी तुम्हीही ATM मशिनवरचं Cancel बटण Press करताय? असं केल्यानं Bank Accountला धोका?
टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! आता कर्णधारच संघाबाहेर
अल फलाह विद्यापीठ दहशतवाद्यांची फॅक्टरी?