महायुतीतील नेते धनंजय महाडिक यांनी काय बोलायचे याचे भान ठेवावे (warns) आणि राहुल आवाडे ‘अभी तो बच्चा है’, असा टोला लगावत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, ही निवडणूक केवळ पक्षीय नसून महायुती विरुद्ध कोल्हापूरकर अशीच लढाई असेल. काँग्रेसचा जाहीरनामा येत्या ७ तारखेला जनतेसमोर मांडण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.सतेज पाटील म्हणाले की, सध्या कोल्हापूरकर अनेक अडचणींना सामोरे जात आहेत. महापालिकेत प्रशासकांच्या माध्यमातून महायुतीने केलेल्या तथाकथित कामगिरीचा पंचनामा करून तो जनतेसमोर मांडला जाणार आहे. कोल्हापूरची झालेली वाताहत याला महायुती सरकार जबाबदार असून, १०० कोटींच्या रस्त्यांपैकी एकही रस्ता पूर्ण झालेला नाही. मात्र मुख्यमंत्री आले की एका रात्रीत रस्ते होतात, अशी टीकाही त्यांनी केली.

महायुतीतील नेत्यांवर निशाणा साधताना त्यांनी सांगितले की, (warns) धनंजय महाडिक यांनी कोणत्या विषयावर बोलायचे आहे, याचे आधी ज्ञान आत्मसात करावे. जर जनता त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत असती, तर त्यांचा २ लाख ७० हजार मतांनी कार्यक्रम झाला नसता. राज्यात महायुतीचे उमेदवार बिनविरोध कसे निवडून येतात, यामागे पैशाचा आणि दबावाचा वापर होत असल्याचा आरोप करत, याची निपक्षपाती चौकशी निवडणूक आयोगाने करावी अशी मागणी त्यांनी केली. बिनविरोध निवडणुकांबाबत चौकशीचे आदेश आजच निवडणूक आयोगाने दिल्याचेही त्यांनी नमूद केले.काँग्रेसकडे जनतेकडून १२ हजार सूचना आल्या असून, त्यातील सर्वाधिक तक्रारी रस्त्यांबाबत असल्याचे त्यांनी सांगितले. जनसुराज्य आणि राष्ट्रवादी हे भाजपचीच ‘बी टीम’ असल्याचा आरोप करत, कोल्हापूरकरांची धास्ती घेतल्यामुळेच महायुती तयार झाली असल्याचा दावाही त्यांनी केला. पक्षशिस्तीबाबत बोलताना, अपक्ष अर्ज भरून माघार न घेतलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, तर अर्ज मागे घेतलेल्यांचा आभारप्रदर्शनाचा कार्यक्रम घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

महायुतीतील अंतर्गत वादांवर टीका करताना सतेज पाटील म्हणाले की,(warns) एकमेकांवर टीका करायची आणि सत्तेत मात्र एकत्र बसायचे, हे दुटप्पी राजकारण आहे. सत्तेतील नेत्यांकडूनच टीका होत असेल तर अजित पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अन्यथा भाजपने त्यांना बाहेर काढावे, असा थेट इशाराही त्यांनी दिला. आरोग्य खात्याच्या स्थितीवर टीका करत गडचिरोलीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी संबंधित कुटुंबीयांची भेट घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.लाडकी बहीण योजनेपेक्षा सध्या महागाई हा माता-भगिनींसमोर मोठा प्रश्न असल्याचे सांगत, आमचे कोणावरही वैयक्तिक टार्गेट नसून कोल्हापूरचा विकास हाच आमचा उद्देश आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. “कोल्हापूरची जनता हीच आमची खरी ताकद आहे,” असे सांगत अखेरीस त्यांनी “१५ जानेवारी – काँग्रेसचं भारी” असा नारा देत पत्रकार परिषद संपवली.

हेही वाचा :

आचारसंहिता सुरू असतानाच कोल्हापुरातील ६२ सीसीटीव्ही बंद

इचलकरंजी निवडणूक रणांगणात मोठी हालचाल; २२ उमेदवारी अर्ज माघारी,

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १० वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी महत्वाचा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *