उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टाने ठोठावला दंड, काय आहे प्रकरण ?
माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या बदनामी प्रकरणी(court) एक मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना ( उबाठा गटाचे नेते) उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने दंड ठोठावला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या दोघांनाही प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. येत्या दहा दिवसांत ही रक्कम राहुल शेवाळे यांना देण्यात यावी असा आदेशही न्यायालयाने दिला.
राहुल शेवाळे(court) यांच्या बदनामीच्या प्रकरणात न्यायदंडाधिकाऱ्यांनी बजावलेले समन्स रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी बुधवारी विशेष न्यायालयात धाव घेतली होती. ठाकरे आणि राऊत यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावला होता. तसेच, त्यांना समन्स बजावून न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.
खासदार आणि आमदारांच्या विशेष न्यायालयाने विलंब माफीसाठी दोघांनी दाखल केलेला अर्ज स्वीकारल्यानंतर हा दंड ठोठावण्यात आला. न्यायदंडाधिकाऱ्यांनी बजावलेले समन्स रद्द करण्याच्या मागणीसाठी ठाकरे आणि संजय राऊत यांनी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश रोकडे यांनी ठाकरे आणि राऊत यांचा विलंब माफीचा अर्ज मान्य केला. मात्र त्याचवेळी न्यायालयाने ठाकरे व राऊत या दोघांनाही प्रत्येकी २ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
हा अर्ज स्वीकारताना विशेष न्यायालयाचे न्यायाधीश रोकडे म्हणाले, विलंबाच्या स्पष्टीकरणावरून दोन्ही नेत्यांनी तो जाणूनबुजून केलेला नाही हे स्पष्ट होते. याचिकाकर्त्यांशी स्पर्धा करणारा कोणताही बचाव मुद्दाम केलेला नाही, असे निरीक्षण नोंदवले. त्यामुळे, त्यांचा विलंब माफीचा अर्ज मान्य केला जात असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
आपल्या विरोधात लेख प्रसिद्ध केल्याबद्दल शेवाळे यांनी बदनामीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीसंदर्भात माझगाव दंडाधिकारी न्यायालयात कार्यवाही सुरू आहे. कार्यवाही दरम्यान, दंडाधिकारी न्यायालयाने या दोघांना खटल्यातून मुक्त करण्यास नकार दिला होता. नियमानुसार दोघांनीही दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाला तातडीने आव्हान द्यायला हवे होते, ते त्यांनी केले नाही. नियमांनुसार विहित केलेल्या बाह्य मुदतीपासून 84 दिवसांचा विलंब झाला. त्यामुळे दोघांनीही विलंब माफ करण्यासाठी त्यांचे वकील मनोज पिंगळे यांच्यामार्फत अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयाने ठाकरे व राऊत या दोघांनाही हा दंड ठोठावला असून दहा दिवसांच्या आत हे पैसे शेवाळे यांना देण्याचे आदेश दिले.
हेही वाचा :
राज्यमंत्री पदावर नाखूष; आता NCP ला मोदी सरकारडून मोठी ऑफर
WhatsAPP ची मोठी कारवाई, ७० लाख अकाऊंट केले बंद, तुम्हीही या चुका करू नका, अन्यथा..
माजी मुख्यमंत्र्यांवर अटकेची टांगती तलवार, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप