कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या भावनांशी जोडलेली आणि शहराची ओळख बनलेली तावडे हॉटेल (Hotel)येथील स्वागत कमान आता इतिहासजमा झाली आहे. तब्बल अठ्ठावीस वर्षे पर्यटकांचे स्वागत करणारी ही कमान गुरुवारी रात्री उतरविण्यात आली. गेल्या काही वर्षांत कमानीची दुरवस्था झाल्याने आणि अपघाताचा धोका निर्माण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. रात्री 10 वाजल्यापासून महापालिकेच्या पथकाने दोन पोकलेन, सहा डंपर आणि इतर यंत्रसामग्रीच्या मदतीने काम सुरू केले.

साडेदहा वाजता कमानीवरील फलक उतरविण्यात आला आणि काही मिनिटांतच कमान पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली. दोन तासांच्या अखंड प्रयत्नानंतर कमान पूर्णतः हटविण्यात आली आणि मलबा डंपरच्या सहाय्याने इतरत्र हलवण्यात आला. या दरम्यान, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी तावडे हॉटेलमार्गे(Hotel) येणारी वाहतूक उचगावमार्गे, तर शहरातून बाहेर जाणारी वाहतूक छत्रपती ताराराणी चौक-बावडा रोडमार्गे वळवण्यात आली होती. या कामादरम्यान नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, मात्र कारवाईत अडथळा येऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांना सुरक्षित अंतरावर हटवले.
या वेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त परितोष कंकाळ, सहायक आयुक्त कृष्णात पाटील, जलअभियंता हर्षजित घाटगे, शहर अभियंता रमेश मस्कर, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, आणि उपशहर अभियंता निवास पोवार आदी अधिकारी उपस्थित होते. महापालिकेने सांगितले की, लवकरच याच ठिकाणी नवीन आणि आकर्षक स्वागत कमान उभारण्यात येणार आहे, जी कोल्हापूरच्या वैभवाला पुन्हा एकदा उजाळा देईल.

हेही वाचा :
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताच्या तेल खरेदीबद्दल अत्यंत मोठा दावा
मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट; दोन संशयित ताब्यात
मटकी खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे