उत्तर भारतात थंडीचा जोर वाढला असल्या कारणानं आता महाराष्ट्रातसुद्धा(Maharashtra) थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. ज्यामुळं राज्यात मुंबईसह बहुतांश भागांमध्ये तापमानात लक्षणीय घट होण्यास सुरुवाचत झाली असून त्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात दिसणार असल्याचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे. तिथं विदर्भासह कोकणातसुद्धा तापमानात घट नोंदवण्यात आली असून, रात्रीच्या तापमानात मोठी घट नोंदवण्यात आली आहे. तर, घाटमाथ्यावरील भागांमध्ये पहाटेच्या वेळी दाट धुक्याची चादर असल्याच कारणानं दृश्यमानतेवर याचा परिणाम होतना दिसत असून, त्यामुळं नागरिकांना या भागात प्रवास करताना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निफाडमध्ये पारा आणखी खाली गेला असून, थंडीची तीव्रता दिवसागणिक वाढताना दिसतत आहे. तर, अकोल्यात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी जाणवत आहे. फक्त एका आठवड्यात तापमान तब्बल 10 अंश सेल्सिअसने घसरल्यानं सध्या अकोल्यातील किमान तापमान 12.5 अंश सेल्सिअस नोंदवण्यात येत आहे.अकोला शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीवरही थंडीचा ठसा स्पष्टपणे दिसत आहे.
नदीच्या पाण्यावर घनदाट धुक्याची चादर पसरली असून, जणू पाण्यातून थंड वाफा उठत असल्याचा भास होत आहे. सकाळच्या सुमारास नदीकाठचा परिसर पूर्णपणे धुक्यात हरवलेला दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवस अकोल्यात अशीच कडाक्याची थंडी कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मागील 24 तासांमध्ये मुंबई शहर(Maharashtra) आणि उपनगरांमध्ये शीतलहरी सुरू झाल्या असून, त्यामुळं या गार वाऱ्यांनी मुंबईलाही कापरं भरलं आहे. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर तापमानात होणारी घट थेट 20 अंशांपर्यंतच पोहोचत असल्या कारणानं नागरिकांना गुलाबी थंडी अनुभवता येत आहे. दरम्यान, राज्याच्या बहुतांश भागांमध्ये थंडीचं असंच चित्र पाहता येत असून, पहाटे आणि रात्री गारठा, तर दिवसा तळपता सूर्य अशीच स्थिती दिसून येत आहे.
संध्याच्या घडीला वातावरणात दिसणारा बाष्पाचा अभाव, उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरी यामुळं महाराष्ट्रात थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र इथं काही ठिकाणी सातत्यानं किमान तापमानात घट होत असल्यानं पुढील दोन दिवस हीच स्थिती कायम राहणार असल्याचा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
दरम्यान, त्यानंतर मात्र ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ म्हणजेच पश्चिमी झंझावात थंडीवर परिणाम करताना दिसेल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. सध्या राज्यात नाशिक, नंदूरबार, मालेगाव, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी या भागांमध्ये पहाटेचं तापमान सरासरीपेक्षा 4-5 अंश सेल्सिअसनं कमी असून, 18 नोव्हेंबरपर्यंत थंडीचा कडाका कायम राहण्याचा प्राथमिक अंदाज असून, 22 नोव्हेंबरपासून त्यात किमान दिलासा मिळू शकतो.
जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड यांसारख्या पर्वतीय भागांसह उत्तरपूर्वेला असणाऱ्या राज्यांमध्ये पर्वतीय क्षेत्रांत हिमवृष्टी सुरू आहे. ज्यामुळं मैदानी भागांमध्ये थंडीचा कडाका वाञच असून, या तिन्ही राज्यांमध्ये तापमानात आणखी घट होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. उत्तरेकडील ही थंडीची लाट महाराष्ट्रावरही परिणाम करेल. तर, केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार दक्षिण भारतातील काही राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. श्रीलंकेच्या किनारपट्टी भागानजीक बंगालचा उपसागर आणि क्षेत्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असून, पुढील 24 तासांत ते पश्चिम – उत्तर – पश्चिमेस पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यातच अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती असल्यानं दक्षिण भारतात पावसाचा अंदाज आहे.

हेही वाचा :
SBI च्या करोडो ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 1 डिसेंबरपासून ‘ही’ सेवा बंद होणार
भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचमध्ये मोठा राडा..
अमित ठाकरे संकटात! निवडणूक दृष्टीक्षेपात असतानाच मिळाला धक्का