पती आणि सासूच्या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून 5 महिन्यांच्या बाळाच्या आईने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील म्हसवे येथे 28 वर्षीय विवाहितेने विषप्राशन करत टोकाचे पाऊल उचलले आहे. अमृता राहुल खोत वय 28, रा. देऊळवाडी असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती राहुल राजेंद्र खोत आणि सासू अनिता राजेंद्र खोत रा. म्हसवे यांच्यावर भुदरगड पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली आहे. अमृताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पैशाच्या मागणीसह सततचा त्रास हा आत्महत्येचे प्रमुख कारण ठरल्याचे समोर आले आहे.

देऊळवाडी येथील अमृता अशोक पाटील हिचा 2020 मध्ये म्हसवे येथील राहुल राजेंद्र खोत याच्याशी प्रेमविवाह झाला होता. लग्नाच्या सुरुवातीची दीड ते दोन वर्षे संसार सुखाने चालला. मात्र नंतर किरकोळ कारणांवरून पती आणि सासूने अमृताचा मानसिक छळ सुरू केला. फेब्रुवारी 2025 मध्ये प्रसूतीसाठी राहुलने अम्रिताला माहेरी सोडले. माहेरी असताना सासू अनिता खोतने वारंवार फोन करून “तू पळून जाऊन बिनपैशात लग्न केलेस, तुझ्या वडिलांनी कवडीची मदत केली नाही, माहेरकडून पैसे आण” असे अपमानास्पद बोलत तिला त्रास देत होती.

प्रसूतीनंतर 23 ऑगस्टला अमृताला पाच महिन्यांच्या मुलासह सासरी परत नेले गेले. तेथे पुन्हा घर बांधण्यासाठी माहेरकडून दोन ते तीन लाख रुपये आणण्याचा दबाव सुरू झाला. अमृताने नकार दिल्यावर पतीने मारहाण केली आणि “बाळ घेऊन माहेरी जा” अशा धमक्या दिल्या. अखेरीस अमृताच्या वडिलांनी सासरच्या लोकांची समजूत काढली. मात्र सततच्या या छळाने अम्रिता वैतागली होती.13 नोव्हेंबरला अम्रिताने घरातच विषारी द्रव प्राशन केले. तिची प्रकृती बिघडताच उपजिल्हा रुग्णालय गारगोटी येथे दाखल करण्यात आली. प्रकृती चिंताजनक असल्याने 17 नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान 23 नोव्हेंबरला तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाची फिर्याद अम्रिताचे वडील अशोक गणपती पाटील रा. देऊळवाडी यांनी भुदरगड पोलिसांत दिली असून, पोलिस उपनिरीक्षक योगेश गोरे तपास करत आहेत.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींचं सर्वात मोठं टेन्शन दूर, आदिती तटकरेंकडून योजनेबाबत
लक्ष द्या! नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाची वेळ बदलली; निवडणूक
अंजली दमानिया अजित पवारांविरोधातील 21 किलो