इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत (combined) एकहाती सत्ता स्थापन केली. या विजयामागे भाजपमधील आवाडे–हाळवणकर गटाची अभेद्य एकजूट निर्णायक ठरल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. उमेदवारी न मिळाल्याने पक्षात निर्माण झालेली नाराजी वेळीच दूर करण्यात भाजप नेतृत्वाला यश आले आणि त्याचा थेट फायदा उमेदवारांना झाला.भाजपने बहुतांश प्रभागांत प्रस्थापित आणि ओळखीच्या चेहऱ्यांना उमेदवारी दिली. हा निर्णय पक्षाच्या पथ्यावर पडला. सुरुवातीच्या टप्प्यात शिव–शाहू विकास आघाडीने जोरदार वातावरण तयार केले होते; मात्र ही आघाडी शेवटपर्यंत तीच धार टिकवू शकली नाही. भाजपने आखलेल्या शेवटच्या टप्प्यातील रणनीतीमुळे आघाडीला मर्यादित यशावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे शिव–शाहू आघाडीतील अनेक दिग्गजांचा पराभव राजकीय वर्तुळात धक्कादायक मानला जात आहे.

महापालिकेतील सत्ता खेचण्यासाठी भाजप आणि महाविकास (combined) आघाडीप्रणित शिव–शाहू विकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. भाजपमध्ये आवाडे–हाळवणकर गटाची ताकद एकत्र आल्याने विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. जागावाटपाच्या वादातून शिवसेना ठाकरे गट आघाडीतून बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढवली; तरीही आघाडीकडे काही प्रभागांत प्रभावी चेहरे होते. त्यांच्या जोरावर भाजपला जेरीस आणण्याची रणनीती आखण्यात आली होती, मात्र बहुतांश ठिकाणी ती फसली.विरोधकांकडून समोरच्या उमेदवारांना हलक्यात घेणे, अतिआत्मविश्वास आणि प्रचारातील विस्कळीतपणा या चुका महागात पडल्याचे निकालांनी दाखवून दिले. भाजपमधील नाराजीचा फायदा उठवण्याचे मनसुबे विरोधकांचे धुळीस मिळाले. काही नाराज कार्यकर्ते आघाडीकडे गेले असले तरी त्याचा फारसा परिणाम मतदानावर झाला नाही.

प्रचाराच्या पातळीवरही भाजप सरस ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (combined) यांच्यासह तीन मंत्र्यांनी प्रचारात सहभाग घेतल्याने भाजप-महायुतीला बळ मिळाले. याउलट शिव–शाहू विकास आघाडीकडून माजी मंत्री सतेज पाटील वगळता राज्य पातळीवरील ठळक नेत्यांची अनुपस्थिती जाणवली. त्यामुळे अपेक्षित शक्तिप्रदर्शन होत मतदारांवर प्रभाव टाकता आला नाही.पाणीप्रश्न हा शिव–शाहू आघाडीचा प्रचाराचा केंद्रबिंदू होता; मात्र भाजपने हा मुद्दा प्रभावीपणे खोडून काढला. मुख्यमंत्र्यांच्या रोड शोदरम्यान पाणीप्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, या आश्वासनामुळे विरोधकांच्या आरोपांची धार कमी झाली. भाजपने पॅनेल टू पॅनेल प्रचारावर भर देत क्रॉस व्होटिंगचा धोका टाळला, तर आघाडीकडे अनेक प्रभागांत नियोजनाचा अभाव दिसून आला.

दरम्यान, या निवडणुकीत लोकसहभागातून काही अपक्ष उमेदवारांना बळ मिळाले. स्थानिक नागरिकांनी आर्थिक मदत, प्रचार साहित्य, बॅनर आणि वाहन व्यवस्थेच्या माध्यमातून अपक्षांना पाठिंबा दिल्याचे चित्र दिसून आले.एकूणच वस्त्रनगरीत भाजपचा प्रभाव अधिक मजबूत झाला असून, आवाडे–हाळवणकर गटाच्या एकजुटीवर या निकालांनी शिक्कामोर्तब केले आहे. शिव–शाहू विकास आघाडीच्या दिग्गजांचा पराभव आणि भाजपचा दणदणीत विजय हे इचलकरंजीच्या राजकारणातील महत्त्वाचे वळण ठरले आहे.

हेही वाचा :

इचलकरंजी : प्रभाग १ ते प्रभाग १६ मधील विजयी उमेदवारांची यादी

इचलकरंजी महापालिकेत चुरशीच्या लढतीनंतर भाजपला फायदा.

इचलकरंजीत भाजप-शिवशाहू आघाडीमध्ये काटे की टक्कर; चुरशीच्या लढतीत दोन्ही पक्षाचे ४-४ उमेदवार विजयी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *