इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून धक्का तंत्राचा वापर केला जाण्याची शक्यता स्पष्ट होत आहे. महापौरपदासाठी सर्वाधिक प्रबळ दावेदार मानले जाणारे नगरसेवक विठ्ठल चोपडे यांच्यावर थेट गटनेतेपदाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यांचे एकमेव नाव पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्यात आले आहे. त्यामुळे चोपडे यांचे महापौरपदासाठीचे नाव जवळपास मागे पडल्यात जमा मानले जात आहे.या घडामोडींमुळे भाजपने महापौरपदासाठी वेगळाच राजकीय डाव आखल्याची चर्चा रंगली आहे. वस्त्रनगरीच्या पहिल्या महापौरपदासाठी ओबीसी आरक्षण असून, या प्रवर्गातून प्रथमच निवडून आलेल्या नगरसेविकेला महापौर करण्याची तयारी पक्षाच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे इचलकरंजीच्या राजकारणात महिला महापौर होण्याची शक्यता बळावली असून, निवडीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळू शकतो.

भाजपकडे या पदासाठी तब्बल २७ इच्छुक चेहरे असल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. पहिल्या महापौरपदावर कोणाला संधी द्यायची, याबाबत गेल्या दोन दिवसांपासून पक्षांतर्गत बैठका आणि खलबते सुरू आहेत. अशातच महापौरपदासाठी १० महिन्यांचा कालावधी निश्चित करण्याचा फॉर्म्युला जाहीर झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. हा कालावधी पुरेसा आहे का, तसेच या पदातून भविष्यात प्रभावी राजकीय नेतृत्व तयार होऊ नये यासाठीच हा निर्णय घेतला का, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.सुरुवातीपासूनच अभ्यासू नगरसेवक विठ्ठल चोपडे आणि तानाजी पोवार यांच्यात महापौरपदासाठी मोठी चुरस होती. दरम्यान, दुसऱ्यांदा भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले मनोज हिंगमिरे यांचेही नाव चर्चेत होते आणि त्यासाठी कागदपत्रांची तयारी सुरू होती. मात्र शुक्रवारी सायंकाळी अचानक घडलेल्या राजकीय हालचालीनंतर आवाडे आणि हाळवणकर गटांकडून चोपडे यांच्या गटनेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

आता पुणे येथे बुधवारी विभागीय आयुक्तांच्या बैठकीनंतर चोपडे यांच्या गटनेतेपदाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. एकीकडे गटनेतेपदाचा निर्णय जवळ आला असतानाच, दुसरीकडे महापौरपदासाठी दररोज नवनवीन नावांची चर्चा सुरू आहे. ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या नगरसेविकेच्या नावाला एका वरिष्ठ नेत्याने संकेत दिल्याने पहिल्या महापौरपदावर महिलेला संधी मिळण्याची शक्यता अधिक गडद झाली आहे.या सर्व घडामोडींमुळे भाजपमध्ये निष्ठावंत विरुद्ध आयाराम अशा चर्चांनाही उधाण आले आहे. विविध पदांवर संधी देताना मूळ नगरसेवकांना कितपत प्राधान्य दिले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षात गट-तट नसल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात अंतर्गत धुसफूस सुरू असल्याची जोरदार चर्चा इचलकरंजीच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

हेही वाचा :

राज्यावर पुन्हा दुहेरी संकट! ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

खूशखबर! लाडक्या बहि‍णींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? महत्वाची माहिती समोर

युजवेंद्र चहलच्या आयुष्यात ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री! कोण आहे ती?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *