जोतिबा डोंगरावर पहिल्या पाकाळणी यात्रेला लाखो भाविकांची गर्दी झाली. ‘चांगभलं’च्या जयघोषात गुलाल उधळत भक्तांनी दर्शन घेतले.

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ नंदी, महादेव, चोपडाईदेवी यमाईदेवी काळभैरवाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील पहिली पाकाळणी रविवार यात्रा भक्तिमय वातावरणात झाली.
सोहळ्याच्या निमित्ताने काल डोंगराला मिनी चैत्र यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील सुमारे दोन लाख भाविकांनी जोतिबा देवाचे दर्शन घेतले. उन्हाचा कडाका असूनही पहाटेपासून भाविक डोंगरावर दाखल होण्यास सुरुवात झाली. सकाळी दहा वाजता तर डोंगर हाऊसफुल्ल झाला.लाखो भाविकांनी काल सासनकाठी व मंदिर शिखर पालखीवर गुलाल, खोबऱ्याची उधळण केली.(Changbhalam) चैत्र यात्रेला ज्यांना येता आले नाही, त्या भाविकांनी डोंगरावर गर्दी केली. काल पहिला रविवार पाकाळणी असल्यामुळे शनिवारपासूनच पुजाऱ्यांच्या घरी भाविकांनी गर्दी केली. सकाळी काकड आरती मंगलपाठ, केदार स्त्रोत्र, केदार महिमा या विधींचे पठण झाले.
सकाळी दहा वाजता जोतिबा देवाची अलंकारिक रूपातील महापूजा बांधली. दुपारी बारा वाजता उंटासह सर्व लवाजमा यांच्या उपस्थितीत धुपारती सोहळा झाला. कोडोलीचे सहायक पोलिस निरीक्षक चेतन मसुगटे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक सुरक्षा व्यवस्था तैनात होती. (Changbhalam) रात्री पालखी सोहळा झाला. सोहळ्यास देवस्थान समितीचे अधीक्षक धैर्यशील तिवले, सिंधिया देवस्थानचे अधीक्षक अजित झुगर, ग्रामस्थ, पुजारी, भाविक उपस्थित होते.
ज्या सासनकाठ्या चैत्र यात्रेला आल्या नाहीत, त्या आज पहिल्या पाकाळणीनिमित डोंगरावर दाखल झाल्या. (Changbhalam) यामध्ये कर्नाटक, सांगली, सातारा या भागातील सासनकाठ्यांचा समावेश होता. धुपारतीवेळी सासनकाठ्यांची मिरवणूक निघाली. भाविकांनी भर उन्हात सासनकाठी नाचवण्याचा आनंद घेतला. वेळी गुलाल -खोबऱ्याची उधळण झाली.पाडळी (जि. सातारा) येथील पहिल्या क्रमांकाची मानाची सासनकाठी आज सायंकाळी गावच्या वेशीवर दाखल झाली. या सासनकाठीच्या स्वागतासाठी गाव वेशीवर आले. तेथून सासनकाठीची मिरवणूक काढण्यात आली. गावात रात्रभर छबिना निघाला. नवसाची नारळ तोरणे बांधण्यासाठी गर्दी झाली. काठीच्या दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती.
हेही वाचा :
लाडकी बहीणनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना; दर महिन्याला ५०० रुपये मिळणार
चांगले दिवस आले रे…सोनं तब्बल 12000 रुपयांनी घसरलं, दागिने करण्याची हीच योग्य वेळ!