आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला जात असला तरी, ठाण्यात मात्र भाजप आणि शिंदे गट यांच्यातील सुप्त संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. भाजपने (BJP)ठाण्यात ‘शत प्रतिशत’ कमळ फुलवण्याची तयारी सुरू केली असून, आज, १६ ऑक्टोबर रोजी, पक्षाने इच्छुकांसाठी एका विशेष ‘अभ्यास वर्गाचे’ आयोजन केले आहे. या वर्गाच्या माध्यमातून भाजप स्वबळावर लढण्याचे संकेत देत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

ठाण्याचा महापौर भाजपचाच झाला पाहिजे, या आमदार संजय केळकर यांच्या वक्तव्याने ठाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. केळकर यांच्या या दाव्याला शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी “महापौर कोण होणार हे जनता ठरवेल,” असे सडेतोड उत्तर दिले होते. या शाब्दिक(BJP) चकमकीमुळे महायुतीमधील तणाव स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यातच नवी मुंबईतील भाजप नेते आणि मंत्री गणेश नाईक हे देखील सातत्याने शिंदे गटावर टीका करत असल्याने, ठाण्यातील युतीचे भवितव्य अधांतरी असल्याचे चित्र आहे.
याच पार्श्वभूमीवर, भाजपने आज सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पक्ष कार्यालयात महापालिकेच्या ३३ प्रभागांतील इच्छुकांसाठी एका विशेष ‘शाळेचे’ आयोजन केले आहे. या अभ्यास वर्गात आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि शहराध्यक्ष संदीप लेले हे इच्छुकांना मार्गदर्शन करणार आहेत. निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या माजी नगरसेवकांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांना या वर्गात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या ‘परीक्षेत’ इच्छुकांना पक्षाची धोरणे, भूमिका, त्यांनी प्रभागात केलेले काम आणि पक्षासाठी दिलेले योगदान यांसारख्या निकषांवर पारखले जाणार आहे. यासाठी एक विशेष परिचय पत्र भरून घेतले जात आहे, ज्यामध्ये उमेदवाराची वैयक्तिक माहिती, मतदार यादीतील क्रमांक, पक्षासाठी केलेले काम आणि आरक्षणाच्या दृष्टीने जातीचा उल्लेख अशा विविध बाबींचा समावेश आहे. यावरुनच भाजप निवडणुकीसाठी किती सूक्ष्म नियोजन करत आहे, याचा अंदाज येतो.राज्यात जरी महायुती एकत्र निवडणूक लढणार असल्याचे सांगितले जात असले, तरी ठाण्यातील भाजपची ही जोरदार तयारी पाहता ऐनवेळी ‘एकला चलो रे’चा नारा दिला गेल्यास आश्चर्य वाटायला नको, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
हेही वाचा :
दीपिका पदुकोण बनली Meta AI चा नवा आवाज…
हवामान खात्याचा पावसाचा इशारा…
सोनाक्षी सिन्हा खरंच आहे प्रेग्नेंट?