इचलकरंजी शहरातील बहुतांश रस्ते आज अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असून,(Narrow) विशेषतः मुख्य मार्गांवर फेरीवाल्यांचे प्राबल्य वाढले आहे. रस्त्याच्या दुतर्फा मांडलेले स्टॉल, टपऱ्या आणि अनियंत्रित पार्किंगमुळे वाहनचालकांना अक्षरशः वाट काढत पुढे जावे लागत आहे. परिणामी शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून नागरिकांना रोजच्या प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागत आहे.आठवडा बाजारासाठी स्वतंत्र व्यवस्था असतानाही शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर दररोजच बाजार भरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे. महापालिकेने यापूर्वी ‘नो हॉकर्स झोन’ घोषित केले असले, तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. अनेक वेळा फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली, मात्र ती केवळ तात्पुरती ठरली आहे. एक-दोन दिवसांतच पुन्हा पूर्वीचीच परिस्थिती निर्माण होते.

राजकीय पाठबळाच्या जोरावर रातोरात विनापरवाना टपऱ्या उभ्या राहत(Narrow) असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. महापालिका झाल्यानंतर अतिक्रमणावर अंकुश बसेल, अशी अपेक्षा होती. सुरुवातीच्या काळात प्रशासक राजवटीत काही प्रमाणात शिस्त लावण्याचा प्रयत्न झाला, मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे त्या कारवाया थंडावल्याचे चित्र आहे. परिणामी मुख्य मार्गांवरील अतिक्रमणाचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे.महापालिकेकडून फेरीवाल्यांना फिरत्या विक्रीसाठी परवाने दिले जात असले, तरी प्रत्यक्षात अनेकांनी एकाच ठिकाणी कायमस्वरूपी आपली जागा निश्चित केली आहे. शहरात नोंदणीकृत फेरीवाल्यांची संख्या हजाराच्या आसपास असताना प्रत्यक्षात मात्र त्याच्या तिप्पट ते चौपट फेरीवाले व्यवसाय करत असल्याचे वास्तव आहे. आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर फेरीवाले आणि त्यांच्या ग्राहकांची वाहने कुठेही उभी राहत असल्याने वाहतुकीचा खोळंबा वाढतो आहे.
महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक अधूनमधून कारवाई करते.(Narrow) काही टपऱ्या जप्त केल्या जातात, दंड आकारला जातो आणि काही दिवसांतच त्या पुन्हा त्याच जागी उभ्या राहतात. अतिक्रमण काढण्यासाठी महापालिका झाल्यानंतर अधिक सक्षम यंत्रणा उभी राहणे अपेक्षित होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. कधीमधी वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर उतरतात, पण सातत्यपूर्ण कारवाईचा अभाव जाणवतो.सण-उत्सवांच्या काळात तर मुख्य मार्गांवरच बाजार भरत असल्याने परिस्थिती अधिकच बिकट होते. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवांनाही बसत आहे. नियम पाळून व्यवसाय करणारे व्यापारी दुकानगाळे भाड्याने घेऊन व्यवसाय करत असताना त्यांच्या दुकानांसमोरच फेरीवाले अल्प शुल्कात व्यवसाय करत असल्याने असंतोष वाढत आहे.

महापालिकेत पथविक्रेता समिती कार्यान्वित करण्यात आली असली, (Narrow) तरी तिची प्रभावी भूमिका अद्याप दिसून आलेली नाही. फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाबाबत ठोस आणि दीर्घकालीन धोरण ठरवणे आता अत्यावश्यक बनले आहे. नवीन महापालिका सभागृह अस्तित्वात आल्यानंतर तरी या समस्येकडे गांभीर्याने पाहिले जावे आणि शहरातील मुख्य मार्ग वाहतुकीसाठी मोकळे केले जावेत, अशी जोरदार अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
हेही वाचा :
पार्टी ऑल नाईट! 31st रात्रभर गाजणार; पब, रेस्टॉरंट पहाटेपर्यंत
१ जानेवारी २०२६ पासून ६ नियम बदलणार, कर्मचाऱ्यांपासून ते
घराच्या बाल्कनी आणि गॅलरीत कबुतरं येऊ नयेत यासाठी सोपे, मुघल