इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज (candidates) माघारी घेण्याची मुदत आज संपली असून, अवघ्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली पाहायला मिळाल्या. एकूण ३८३ उमेदवारांपैकी तब्बल १५३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक रिंगणातील चित्र मोठ्या प्रमाणात बदलले आहे. यामध्ये दहा विविध राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांचाही समावेश असून, आता अंतिम टप्प्यात २३० उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.शहरातील चारही प्रभाग समिती कार्यालयांत उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली. दिवसभर कोण माघार घेणार, याबाबत राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता होती. विशेषतः अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांची माघार घडवून आणण्यासाठी विविध पक्षांच्या अधिकृत यंत्रणा सक्रीय झालेल्या दिसून आल्या. आज ता. ३ निवडणूक चिन्हांचे वाटप होणार असल्याने आता प्रचाराला खऱ्या अर्थाने वेग येण्याची शक्यता आहे.

जुनी नगरपालिका प्रभाग समिती कार्यालयात (candidates)सकाळपासूनच उमेदवारांची व त्यांच्या समर्थकांची गर्दी वाढत गेली. दुपारी दोन वाजल्यानंतर माघारीसाठी मोठी धावपळ सुरू झाली. शेवटच्या पंधरा मिनिटांत उमेदवारांची पळापळ पाहायला मिळाली, ज्यामुळे वातावरणात चांगलाच थरार निर्माण झाला. येथे दोन पक्षीय उमेदवारांसह अनेक अपक्षांनी माघार घेतली असून, एकूण ४९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. उमेदवारी मागे घेतल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर नाराजी आणि उदासीनता स्पष्टपणे जाणवत होती.शाहू पुतळा प्रभाग समिती कार्यालयात दोन दिवसांत एकूण ३५ उमेदवारांनी माघार घेतली आहे. आता या प्रभागांमध्ये ५२ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत. बहुतांश प्रभागांमध्ये दुरंगी, तर काही ठिकाणी बहुरंगी लढती होण्याचे संकेत मिळत आहेत. माघारीच्या शेवटच्या दिवशी सकाळपासूनच कार्यालयाबाहेर राजकीय हालचालींना जोर आला होता. अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांशी वाटाघाटी करून काही प्रभागांत बिनविरोध निवडणूक घडवून आणण्याचे प्रयत्न झाले, मात्र ते यशस्वी ठरले नाहीत. काही ठिकाणी पक्षांतर्गत बंडखोरीमुळे अधिकृत उमेदवारांची अडचण वाढल्याचेही दिसून आले.
बाळासाहेब माने भवन प्रभाग समिती कार्यालयात मात्र माघारीची प्रक्रिया तुलनेने शांततेत पार पडली. दोन दिवसांत येथे ३३ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. यामध्ये अपक्षांसह डमी उमेदवारांचे प्रमाण अधिक होते. कोणताही तणाव किंवा गोंधळ न होता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रक्रिया पार पडली.शहापूर प्रभाग समिती कार्यालयात माघारीच्या दुसऱ्या दिवशी वातावरण मात्र चांगलेच तापले होते. दोन दिवसांत एकूण ३६ उमेदवारांनी माघार घेतली असून, ६१ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत अपक्ष उमेदवारांची मनधरणी, गोंधळ आणि धावपळ सुरू होती. काही प्रभागांत बंडखोर उमेदवारांच्या माघारीसाठी नाट्यमय प्रसंग घडले, तर काही ठिकाणी अंतिम वेळ निघून गेल्याने माघार स्वीकारली गेली नाही. दुपारी दोन वाजल्यानंतर अपक्ष उमेदवारांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र होते.

दरम्यान, इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत राजकीय(candidates) रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. आज शिव-शाहू विकास आघाडीसह सर्व अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. शिव-शाहू विकास आघाडीला एकत्रित चिन्ह मिळणार की उमेदवारांना वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवावी लागणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. चिन्ह वाटपानंतर प्रचार अधिक तीव्र होणार असून, आगामी दिवसांत इचलकरंजीतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
आचारसंहिता सुरू असतानाच कोल्हापुरातील ६२ सीसीटीव्ही बंद
इचलकरंजी निवडणूक रणांगणात मोठी हालचाल; २२ उमेदवारी अर्ज माघारी,
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १० वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी महत्वाचा