हातकणंगले कल्याण, पालघर, आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर .
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची दुसरी यादी कधी जाहीर होणार याकडे राजकीय(Candidates) पक्ष आणि प्रसारमाध्यमांबरोबरच सर्वांनाच उत्सुकता होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेमध्येच दुसरी यादी जाहीर केली. कल्याण, पालघर, हातकणंगले आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार त्यांनी जाहीर केले. कल्याण मतदारसंघातून शिवसेनेच्या रणरागिणी वैशाली दरेकर-राणे यांना रणमैदानात उतरवण्यात आले आहे. शिवसेनेने आतापर्यंत 21 शिलेदार जाहीर केले आहेत.
उद्धव ठाकरे यांची आज ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषद झाली. यावेळी शिवसेना उमेदवारांची दुसरी यादी कधी जाहीर होणार असे माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना विचारले असता, घ्या लिहून असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी चार मतदारसंघांतील उमेदवार जाहीर केले.tपालघर लोकसभा मतदारसंघामधून आदिवासी महिला कार्यकर्त्या भारती कामडी या शिवसेनेच्या उमेदवार असतील असे उद्धव ठाकरे म्हणाले. हातकणंगले मतदारसंघातून सत्यजीत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर जळगावमधून पारोळय़ाचे माजी नगराध्यक्ष करण पवार हे शिवसेनेचे उमेदवार असतील असे सांगतानाच, जळगावमधून शिवसेनेचा भगवा लोकसभेवर गेल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उत्तर व उत्तर मध्य मुंबई लढायलाही शिवसेना तयार
मुंबईतील सहापैकी चार जागा वाटाघाटीमध्ये शिवसेनेकडे आल्या. तेथील उमेदवार (Candidates)जाहीर करण्यात आले आहेत. उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ मित्रपक्षांकडे आहेत. ते लढणार नसतील तर तिथेही शिवसेनेकडे उमेदवार तयार आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. देशात हुकूमशाहीविरुद्ध लाट असल्याने कोणत्याही मतदारसंघात लढायला शिवसेना तयार आहे, असे ते म्हणाले. मुंबईतील उरलेल्या दोन जागांवर मित्रपक्षांनी उमेदवार जाहीर केले की शिवसैनिक शिवसेनेच्या उमेदवाराप्रमाणेच त्यांचा प्रचार करतील, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
राजू शेट्टींनी मशाल न घेतल्याने हातकणंगलेत उमेदवार द्यावा लागला
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्याबरोबरची बोलणी फिसकटली का, असा प्रश्न यावेळी माध्यमांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. त्यावर, बोलणी फिसकटण्याचा प्रश्न नाही पण हुकूमशाही गाडायची असेल तर विरोधी पक्षांची ताकद वाढायला हवी, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 2019 मध्ये कोल्हापूरमधील दोन्ही जागांवर तेथील मतदारांनी शिवसेनेला विजयी केले होते. त्यातील एक जागा यावेळी आम्ही छत्रपती शाहू महाराजांचा मान ठेवून काँग्रेसला दिली. दुसरी जागा सोडली तर तेथील शिवसेनाप्रेमी हिंदुत्ववादी मतदार नाराज होण्याची शक्यता आहे. म्हणून आम्ही हातकणंगले व सांगली लढवण्याचा निर्णय घेतला, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी यावेळी बोलताना सांगितले की, राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’वर दोन बैठका झाल्या. राजू शेट्टी हे शेतकऱयांसाठी चांगले काम करताहेत, पण हातकणंगले हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. यावेळी शिवसेनेने पाठिंबा द्यावा अशी शेट्टींची भूमिका होती. पण तेथील पदाधिकाऱयांनी विनंती केली की, तिथे शिवसेनेचा उमेदवार असावा आणि तो ‘मशाल’ चिन्हावरच लढावा. तुमचा पक्ष रीतसर महाविकास आघाडीत सामील करा आणि तुम्ही मशाल चिन्हावर लढा, अशी विनंती शिवसेनेने शेट्टींना केली होती. पण त्यांनी मशाल घेता येणार नाही असा निरोप पाठवला. त्यामुळे शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजीत पाटील यांची उमेदवारी शिवसेनेने जाहीर केली, असे संजय राऊत यांनी सांगितले.
कल्याणमध्ये मस्तवाल गद्दारांना शिवसैनिक गाडणार
पहिला कोणता उमेदवार जाहीर करू, असे उद्धव ठाकरे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना विचारताच त्यांनी बहुप्रतीक्षित कल्याण मतदारसंघाचा उल्लेख केला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेने अनेक साधे कार्यकर्ते, सामान्य माणसे मोठी केली. त्यातील काही गद्दार निघाले आणि ते पलीकडे गेले, पण त्यांना मोठी करणारी माणसे शिवसेनेतच राहिली. त्यामुळे कल्याणमधून शिवसेनेच्या कट्टर कार्यकर्त्या वैशाली दरेकर-राणे या उद्याच्या कल्याणच्या खासदार असतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले. वैशाली दरेकर या सर्वसामान्य कुटुंबातील आहेत असे सांगतानाच, कल्याणमधील तमाम शिवसैनिक व शिवसेनाप्रेमी मतदार तेथील मस्तवाल गद्दारांना टक्कर देऊन त्यांना गाडणारच, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा :
मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी; मिस्टर ३६० सूर्या झाला फिट
सांगलीतील 80 गावे टंचाईग्रस्त, 73 टँकरने पाणीपुरवठा
शुभमंगल सावधान! 10 वर्षांच्या डेटींगनंतर तापसी पन्नू अडकली लग्नबंधनात