पुणे आणि परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि निसर्गप्रेमी यांच्या सहभागातून फुलपाखरांचे निरीक्षण, फोटोग्राफी, संशोधन आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जाणार आहेत.

पुणे/सुनयना सोनवणे: फुलपाखरांना निसर्गाने रंगांची उधळण करून सुंदर रूप दिले आहे. या फुलांवरून त्या फुलांवर सैरभैर फिरणारे फुलपाखरू सर्वांनाच आकर्षित करते. पावसाळ्यानंतर कोवळ्या उन्हात मुक्तपणे विहारनारी फुलपाखरे आपल्या परिसराची एकंदरीत गुणवत्ता उत्तम असल्याचे सांगतात. तसेच त्यांच्या सौंदर्याव्यतिरिक्त फुलांच्या परागीकरणातही ते महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे जिथे फुलपाखरू असतात तिथे जैवविविधता समृद्ध असते, असे मानले जाते. फुलपाखराला जगातील सर्वाधिक आकर्षक कीटकाचा मान मिळाला आहे. गेल्या काही वर्षात फुलपाखरांची वसतीस्थाने नष्ट होत असल्यामुळे त्यांच्या अनेक प्रजाती धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे या फुलपाखरांना वाचविण्याची गरज आहे.
सप्टेंबर महिना हा ‘बिग बटरफ्लाय मंथ’ म्हणून साजरा केला जातो. याद्वारे फुलपाखरांचे विश्व उलगडण्याचा प्रयत्न केला जातो. कुठल्या भागात कोणत्या प्रजातीची फुलपाखरे आढळतात, त्यांचा अधिवास इत्यादी संदर्भात अभ्यास केला जातो. फुलपाखरांचे आकर्षण असलेल्या देशभरातील निसर्गप्रेमींनी एकत्र येऊन फुलपाखरांच्या माहितीचा संग्रह करावा आणि त्यातून फुलपाखरांच्या संवर्धनाला मदत व्हावी म्हणून हा उत्सव आयोजित करण्यात येतो.
पुणे आणि परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि निसर्गप्रेमी यांच्या सहभागातून फुलपाखरांचे निरीक्षण, फोटोग्राफी, संशोधन आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जाणार आहेत. वेताळ टेकडी, सिंहगड खोरे, सासवड तालुका येथे फुलपाखरू वॉक आयोजित केले जाते. या वॉकमध्ये कॉमन पियरोट, लेमन पँसी, ब्लू मॉर्मन, पीकॉक पँसी यांसारख्या विविध प्रजातींचे निरीक्षण आणि दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे.
औंध येथील रहिवासी मनीषा कामदार यांनी सांगितले की, “सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे फुलपाखरे पाहण्यासाठी सर्वोत्तम महिने आहेत. मागील वर्षी आम्ही असेच उपक्रम अनुभवले होते आणि यंदाही आम्ही उत्सुकता आहे.” अमोल नारगोळकर यांचे सिपना फार्म हे फुलपाखरू निरीक्षणासाठी खास आकर्षण ठरणार आहे. “सकाळच्या पावसानंतर दुपारपर्यंत अनेक फुलपाखरे दिसतात. वेगवेगळी फुलपाखरे आकर्षित व्हावीत म्हणून आम्ही नवीन वनस्पतींची लागवडही सुरू केली आहे, असे नारगोळकर यांनी सांगितले.
पर्यावरणतज्ञ रजत जोशी यांच्या मते, सप्टेंबरच्या शेवटी पाऊस कमी होतो. त्यामुळे फुलपाखरांचे वैविध्य पाहायला मिळते. म्हणून या काळात कार्यशाळा, शालेय व महाविद्यालयीन उपक्रम आणि सार्वजनिक वॉक आयोजित केले जातील. फुलपाखरांच्या छायाचित्रणासाठी खास कार्यशाळाही होणार आहेत. कोंढवा येथील शालिनी गुलाटी म्हणाल्या, “मी सूक्ष्म हालचाली टिपण्यासाठी विशेष लेन्स घेतली आहे. छायाचित्रकार मित्रांसह या कार्यशाळेत सहभागी होणार आहे.”
नॅचरलिस्ट फाउंडेशनचे सचिन राणे यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर व रायगड येथे फुलपाखरांची शर्यत आयोजित केली आहे. यात सहभागींना फुलपाखराच्या जीवनचक्राचे टप्पे नमूद करून त्यांचे निरीक्षण सादर करावे लागणार आहे. दरम्यान, रानवा या पुण्यातील स्वयंसेवी संस्थेचे संशोधन प्रमुख डॉ. अंकुर पटवर्धन यांनी सांगितले की, “पुढील महिनाभर आम्ही फुलपाखरांनी भेट दिलेल्या फुलांचे निरीक्षण करू. तसेच त्यांच्या नैसर्गिक अधिवासातील नर-मादी प्रमाणाचाही अभ्यास होईल. शहरी भागात आतापर्यंत १२५ प्रजातींची नोंद झाली आहे.” या विविध उपक्रमांमधून केवळ फुलपाखरांचे सौंदर्य अनुभवण्याची संधी नाही तर जैवविविधतेचे संवर्धन, वैज्ञानिक निरीक्षण आणि पर्यावरण जागरूकता याही बाबींना चालना मिळणार आहे.
हेही वाचा :
मराठा आरक्षणावर प्रश्नचिन्ह! 58 लाख नोंदींचा डाटा सरकारकडे नाही
मराठ्यांचं टेन्शन वाढलं! ‘हा सरसकट जीआर नाही
रस्त्यावर भीक मागतोय हा प्रसिद्ध कलाकार….