विटा (सांगली): सांगली जिल्ह्यातील विटा शहरात सोमवारी पहाटे घडलेल्या भीषण आगीच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सावरकरनगरमधील जय हनुमान स्टील सेंटर अँड इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात पहाटे आग लागून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये गरोदर(pregnant) महिलेचाही समावेश असून ती भावाच्या लग्नानिमित्त माहेरी आली होती. या घटनेनं विटा परिसरात शोककळा पसरली आहे.ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, शॉर्टसर्किट किंवा दुकानातील फ्रिजच्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

या आगीत दुकानमालक विष्णू पांडुरंग जोशी (वय 47), त्यांची पत्नी सुनंदा जोशी (वय 42), मुलगी प्रियांका इंगळे (वय 25) आणि नात सृष्टी इंगळे (वय 2) या चौघांचा जागीच मृत्यू झाला. प्रियांका ही गरोदर(pregnant) होती आणि 16 नोव्हेंबरला भावाच्या लग्नासाठी ती माहेरी आली होती.रविवारी दिवसभर लग्नाच्या तयारीत व्यस्त असलेले जोशी कुटुंब रात्री उशिरा घरी परतले. सकाळी साडेआठच्या सुमारास दुकानाच्या शटरमधून धूर बाहेर येत असल्याचे शेजाऱ्यांनी पाहिले आणि तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी हाका मारल्या पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शटर तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न होताच आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट एकदम बाहेर पडले, त्यामुळे बचावकार्य अधिक कठीण झाले.

विटा नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र आगीचा फैलाव मोठा असल्याने कडेगाव, कुंडल, उदगिरी, पलूस आणि तासगाव येथील अग्निशमन बंब तातडीने बोलावण्यात आले. एकूण सहा बंबांच्या मदतीने आग विझविण्याचे प्रयत्न दुपारी एक वाजेपर्यंत सुरू होते.ही इमारत तीन मजली असून खालच्या मजल्यावर दुकान आणि वरच्या दोन मजल्यांवर जोशी कुटुंब राहत होते. वर जाण्यासाठी एकच मार्ग असल्याने बचावकार्यात अडथळे आले. तसेच दोन्ही बाजूंना लागून असलेल्या इमारतींमुळे आग विझविणे अधिक अवघड झाले. अग्निशमन दल आणि स्थानिकांच्या प्रयत्नांनंतर शेवटी आग नियंत्रणात आणण्यात आली.

या घटनेत जोशी कुटुंबातील दोघांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले, तर चार जणांचा भाजून मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या भीषण घटनेनंतर संपूर्ण विटा शहरात शोककळा पसरली असून नागरिकांनी महावितरण आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

11,000 रुपये वाचवा, OnePlus 13 वरील Amazon ऑफर जाणून घ्या

पुढच्या वर्षी सोन्याचे दर काय असतील? जाणून घ्या संभाव्य किंमती

निवडणुकीपूर्वी राजकीय भूकंप! करुणा मुंडेंची मनोज जरांगेंना ‘ती’ मोठी ऑफर!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *